सुंदर केसांसाठी उपाय। 100 % आयुर्वेदिक उपायांनी प्राप्त करा दाट, काळेभोर, चमकदार केस!

लांबसडक, दाट , काळेभोर, चमकदार केस कोणाला नको असतात. आयुर्वेदामध्ये सुंदर केसांसाठी उपाय म्हणून अनेक छोट्या-छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत. त्या आम्ही आज आपल्याला सांगणार आहोत.

सुंदर केसांसाठी उपाय -Intro

 

केसांसाठी उपाय – तेल कोणते, कधी व कसे लावावे

सुरवातीला तैल कसे लावावे, कधी लावावे, कोणते तैल लावावे या विषयी माहिती असणे महत्वाचे आहे. आयुर्वेदानुसार उन्हाळ्यामध्ये खोबरेल तैल केसांना लावावे. हिवाळ्यामध्ये तिळाचे तैल लावावे. केसांमध्ये अधिकच कोरडेपणा असेल तर एरंड तैल लावावे असे सांगितले आहे. खोबरेल तैल थंड असल्याने उन्हाळ्यात डोकं शांत ठेवते. तीळ तैल अनुष्ण असल्यामुळे ते हिवाळ्यात लावायला सांगितले आहे आणि कोरडेपणा असल्यामुळे एरंड तैल लावावे त्यात स्नेहाचा अंश जास्त असतो.

केस पांढरे न होण्यासाठी उपाय

केस पांढरे होत असतील तर त्यासाठी विशेष उपाय आहेत. शरीरात उष्णता जास्त प्रमाणात असेल तर ती कमी करण्यासाठी महिन्यातून एकदा तरी रात्री झोपताना एरंड तैल  पोटातून घ्यावे. सकाळी पोट खळखळून साफ होते. त्यानंतर हलका आहार घ्यावा. उष्णता कमी होऊन केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते.

लहानपणीच केस पांढरे होत असतील तर अशा मुला मुलींसाठी १ ग्रॅम मिरे पावडर १ वाटी दह्यात मिसळून ते मिश्रण केसांना लावून ठेवावे. साधारणपणे १ तासभर लावून ठेवल्यानंतर केस कोमट पाण्याने धुऊन टाकावेत. यामुळे केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढत चालले असेल तर ते लवकर कमी होते.

सध्या ताजे आवळे बाजारात भरपूर मोठ्या प्रमाणात मिळतात. आवळ्याचा रस केस पांढरे होणे थांबवतो कारण आवळा रसायन मानलेला आहे. केवळ लवणरस आवळ्यामधे नसतो. आवळा हा शरीराला अतिशय उपकारक असतो. रोज सकाळी उपाशीपोटी ४-५ चमचे आवळ्याचा रस घेऊ शकतात. त्यामुळे केस पांढरे होणे थांबते.

कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय

केसांमध्ये सतत कोंडा होत असेल तर केस धुतल्यानंतर एक ग्लास पाण्यात अर्धे लिंबू पिळून घ्यावे व ते पाणी पूर्ण केसांना पसरून लावावे. त्यानंतर केस धुऊ नयेत. लिंबाच्या अम्ल रसामुळे रक्त प्रसादन होऊन कोंडा कमी होण्यास मदत होते.

अंघोळीपूर्वी अर्धा तास केसांच्या मुळांना तैल कोमट करून लावावे. गरम पाण्यात टॉवेल बुडवून तो घट्ट पिळून घ्यावा व तो डोक्याला गुंडाळावा म्हणजे त्याची वाफ डोक्याला व केसांना बसते. त्यानंतर केस स्वछ धुऊन घ्यावेत.

रोज डोक्याला व तळपायांना तैल लावावे. तळपायांना रोज तैल लावल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन शांत झोप लागण्यास मदत होते व डोक्याला तैल लावल्यामुळे डोक्यातला कोंडा कमी होतो, केस चांगले होतात.

जर डोक्यात कोंडा जास्त होत असेल तर खोबरेल तेलात किंवा तुम्ही जे तैल वापरत असाल त्या तेलात १-२ कापराच्या वड्या टाकून विरघळून घ्याव्यात व ते तैल केसांच्या मुळाशी लावून ५-१० मिनिटे मसाज करावा. दुसऱ्या दिवशी केस स्वछ धुऊन घ्यावेत. यातील कापूर जंतुघ्न आहे त्यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होते.

सुंदर केसांसाठी उपाय - कोंडा

काळ्या चमकदार केसांसाठी उपाय

केसांमध्ये अधिक कोरडेपणा असेल तर मेथ्या भिजवून ठेवलेल्या पाण्याने केस धुवावेत म्हणजे केसांमध्ये चमकदारपणा येतो.आवळा चूर्ण ताकात भिजवून त्याचा लेप जर केसांना लावला तर केस मुलायम होतात व केस silky होतात.

कोरफडीला काप देऊन त्यामध्ये मेथ्या भरून ठेवाव्यात व त्यांना मोड आले की मग तो गर काढून तो केसांना लावावा. त्यामुळे केसांचे कंडिशनिंग होते व केसांचा पोत सुधारतो. कोरफडीचा गर केसांना नियमित लावला तर केस गळणे थांबते व केस पांढरे होणे देखील थांबते.

याव्यतिरिक्त खोबरेल तेलामध्ये कढीपत्ता आणि आवळा पावडर टाकून उकळून घेतल्यास ते तैल केसांना लावल्यामुळे देखील केस चांगले काळेभोर होतात.

केसांसाठी उपाय – आहार

केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी विविध उपाय सांगितलेले आहेत त्यासोबतच आहारात काय-काय घ्यावे हे ही सांगितलेले आहे. त्यामध्ये दूध, मासे, केळी, पेरू, चिकू, सफरचंद, टोमॅटो, पालक, मुळा, पुदिना, कोशिंबिरी यांचा आहारात समावेश असावा.

निरोगी केसांसाठी उपाय – या गोष्टी टाळणे!

केस धुतल्यानंतर स्वछ टॉवेलने पुसून घ्यावेत, ते ड्रायरने कधीही वाळवू नयेत. जर तसे वाळवायचे असतील तर ड्रायर किमान ६-८ इंच केसांपासून लांब धरावा. केसांना उष्णतेचा त्रास होतो त्यामुळे गरम पाण्याने केस कधीही धुऊ नयेत, ते कोमट पाण्याने धुवावेत.

केसांचे Straightening करू नये याचे कारण ते करताना जो हीटर वापरतात तो एका चिमट्यासारखा हीटर असतो. त्याच्यामुळे केसांना इजा पोचते. त्यामुळे केस गळणे आणि पांढरे होणे जास्त प्रमाणात दिसून येते.

आपल्या कुठल्याही प्रश्नांसाठी आपण आमच्याशी संपर्क करू शकता.

Looking for Treatment? Book Your Appointment Here.

सुंदर केसांसाठी उपाय या विषयावरील व्हिडिओ पहा

सुंदर आणि निरोगी केसांसाठी घरच्याघरी करता येणारे हे उपाय जाणून घ्या. कोंडा होणे, केस गळणे, केस पांढरे होणे, पातळ होणे अशा अनेक समस्यांसाठी काय उपाय करावे याची शाश्त्रशुद्ध आयुर्वेदिक माहिती मिळवा.

Subscribe