विरुद्ध आहार म्हणजे नक्की काय? आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार म्हणजे काय, विरुद्ध आहार कुठल्या प्रकारचे असतात आणि त्याचे शरीरावर काय परिणाम होतात हे समजून घेणे महत्वाचे ठरते.
विरुद्ध आहाराचे प्रकार
आहार विरुद्धमध्ये संयोग विरुद्ध, काल विरुद्ध, देश विरुद्ध व हृदय विरुद्ध असे विविध प्रकारचे आहार येतात. पण हा आहार जर तुम्ही सेवन केला नाही तर तुम्ही कायमच निरोगी राहाल. आता याची वेगवेगळी उदाहरणे पुढे दिलेली आहेत. लेख शेवटपर्यंत वाचलात तर तुमच्या लक्षात येईल की निरोगी राहण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात.
विरुद्ध आहार – गुण विरुद्ध
दूध आणि मासे एकत्र खाऊ नयेत याचे कारण दूध थंड गुणधर्माचे तर मासे उष्ण गुणधर्माचे असतात. हे नियमित सेवन केल्याने त्वचा विकार, रक्त विकार होऊ शकतात. तसेच हे दोन्हीही अभिष्यंदि म्हणजे मार्गाचे अवरोध करणारे आहेत.
दुसरे उदाहरण म्हणजे थंड आणि गरम पदार्थ एकत्र करून खाऊ नयेत. उदाहरणार्थ गरम जेवणानंतर आपण नेहमी आईस्क्रीम खातो, हे विरुद्ध आहे. आणखी एक म्हणजे गरम चहा पिल्यानंतर लोक थंड पाणी पितात त्यामुळे त्वचा विकार होऊ शकतात.
हल्ली मिल्कशेक करण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. मग गोड, आंबट अशा सर्वच फळांसोबत मिल्कशेक केले जातात. आंबट फळांसोबत दूध ठेवले तर ते नासते, तसेच मिल्कशेक खाल्ल्याने पोटात त्याचा पचनावर परिणाम होतो.
विरुद्ध आहार – संयोग विरुद्ध
संयोग विरुद्धचे एक उदाहरण म्हणजे दूध, लोणी, तेल, वसा म्हणजे चरबी यासारखे जड पदार्थ इतर जड पदार्थांसोबत म्हणजे चिकन,मटण यासोबत संयोग करणे. यामुळे दोन प्रकारच्या जड पदार्थांचे पाचन करताना पोटाला जास्त काम करावे लागते व त्यामुळेही विकार होऊ शकतात.
मध हा स्वभावतःच शीत गुणाचा आहे. जर गरम केला किंवा गरम पदार्थांसोबत जर घेतला तर त्याचे अपचन होऊ शकते म्हणून मध कधी गरम करून खाऊ नये. हल्ली वजन कमी करण्यासाठी गरम पाणी आणि मध एकत्र करून घेतले जाते तर असे शक्यतो घेऊ नये.
विरुद्ध आहार – संस्कार विरुद्ध
संस्कार विरुद्धचे आपण एक उदाहरण पाहूयात. ते म्हणजे सारखे, वारंवार गरम केलेले अन्न, फ्रीजमधून काढून गरम केलेले अन्न किंवा मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेले अन्न. या पदार्थांचे जर आपण सतत सेवन केले, तर त्याने पचनाला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा त्यातले पोषकतत्व आपल्याला मिळत नाहीत.
विरुद्ध आहार – काल विरुद्ध
काल विरुद्ध म्हणजे थंडीत रुक्ष वातवर्धक आहार घेणे. जसे थंडीमध्ये रुक्ष वातवर्धक गोष्टी घेण्याची सवय लागलेली असते म्हणजे खूप थंडी पडलेली आहे आणि आपण आईस्क्रीम खातो, कोल्ड्रिंक पितो. काय होईल यामुळे एलर्जी, त्वचा विकार, रक्त विकार निर्माण होतील.
तसेच तूप आणि मध समप्रमाणात कधीही घेऊ नये, त्यामुळे पचनाचे विकार होऊ शकतात.
काल विरुद्धचे आणखी एक उदाहरण म्हणजे उन्हाळ्यात उष्ण, तिखट, चमचमीत, तळलेले पदार्थ खाणे, यामुळे अंगाला सूज येणे, वारंवार तोंड येणे, मुळव्याध होणे, अंगाला खाज येणे यासारखे विकार होऊ शकतात.
विरुद्ध आहार – देश विरुद्ध
आजकाल आपण पाहतो की जॉब निमित्त किंवा शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. तिथल्या पदार्थांची आपल्या शरीराला सवय नसते तरीदेखील आपण ते पदार्थ खातो. एक उदाहरण पाहूयात – आपण महाराष्ट्रात राहतो पण आपण साउथ इंडियन पदार्थ किंवा नॉर्थ इंडियन पदार्थ आजकाल जास्त खातो, त्यामुळे त्याचा आपल्या पचनावर विपरीत परिणाम होऊन आपल्याला विविध प्रकारच्या व्याधींना तोंड द्यावे लागते.
सवयीने व अल्प सेवनाने म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा जर आपण हे आहार विरुद्ध सेवन केले, तर आपल्याला त्याचा अपाय होत नाही.
विरुद्ध आहार – हृदय विरुद्ध
हृदय विरुद्ध आहार – जसे आपण जेवतोय आणि टीव्ही बघत बसलोय, जेवणात काय आहार आहे, कोणत्या चवीचा आहार आहे हे कधीच कळत नाही आणि म्हणून हृदय आहार विरुद्ध कधीच नसावा. त्यासाठीच शांतपणे, एकांतात जेवण करावे, तसेच जेवताना बोलू नये.
नियमित व्यायाम करणारे, स्निग्ध आहार घेणारे, ज्यांचा अग्नी तीक्ष्ण आहे, जे तरुण आहेत, बलवान आहेत अशांनी कधीतरी आहार विरुद्ध सेवन केला तर त्याचा फारसा परिणाम होत नाही. तसेच सवयीने व अल्प सेवनाने जर आहार विरुद्ध केला तर ते फारसे बाधक होत नाही.
सतत विरुद्ध आहार घेण्याने पचनाचे विकार, अंगाला सूज येणे, त्वचा विकार असे विविध प्रकारचे विकार होऊ शकतात. आहार विरुद्धने उत्पन्न होणाऱ्या रोगांची चिकित्सा वमन, विरेचन तसेच संशमनाने करता येते परंतु विरुद्ध आहार घेतलाच नाही तर कोणतेही विकार उत्पन्न होणार नाहीत.
आपल्याला आरोग्याविषयी काही समस्या किंवा शंका असतील तर आपण आम्हाला थेट संपर्क करू शकता.
आयुर्वेद चिकित्सेसाठी Appointment बुक करा
विरुद्ध आहाराबद्दल माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा
विरुद्ध आहार म्हणजे नक्की काय, विरुद्ध आहाराचे आयुर्वेदाप्रमाणे कुठले प्रकार असतात आणि त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो याबद्दल माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा