स्त्रियांच्या उन्हाळ्यातील समस्या आणि घरगुती आयुर्वेदिक उपचार
स्त्री ही कुटुंबाचा कणा असल्याने स्त्रीला उन्हाळ्यातही काही ना काही कारणाने घराबाहेर पडावंच लागतं. अशा वेळी उन्हाचा तडाखा लागतो व अनेक समस्या निर्माण होतात. अंगाची लाहीलाही होते. स्त्रियांच्या उन्हाळ्यातील समस्या आणि त्यावरील सोपे घरगुती उपाय माहित करून घेणे उपयोगी ठरते.
ऊन लागल्यास काय करावे?
- कांद्याचा रस हातापायाच्या तळव्याला चोळावा.
- कांद्याचा तस ४-४ थेंब कानात घालावा. टाळूवर किंवा बेंबीवर चोळावा.
- धणेजिऱ्याचे खडीसाखर घातलेले पाणी प्यावे. १ चमचा धणे, पाव चमचा जिरे चांगले कुटून १ ग्लास पाण्यात भिजत घालावेत. ते पाणी गाळून १ चमचा खडीसाखर घालून ते पाणी प्यावे.
उन्हाळ्यात ताप आल्यास काय करावे?
उन्हामुळे आलेला ताप हे इन्फेक्शन नसतं. उन्हाळ्यात ताप आल्यावर थंड पाण्याने अंग पुसून घ्यावे. कांद्याचा रस तळपायाला व तळहाताला चोळावा. उन्हाळ्यात काही लोकांना खूप जास्त घाम येतो व डिहायड्रेशन जाणवतं. यासाठी उन्हाळ्यात हवेशीर, साधे, सुती, सैलसर कपडे घालावेत. जाड जीन्स, जॅकेट्स घालू नयेत, त्याने हवा कोंडते. तसेच उन्हात जास्त फिरू नये.
हातापायाच्या तळव्यांची, डोळ्यांची आग होत असेल तर काय करावे?
हातापायाच्या तळव्यांची, डोळ्यांची आग होत असेल तर रात्री झोपताना हातापायांचे तळवे थंड पाण्यात बुडवून, कपड्याने कोरडे करून, त्याला खोबरेल तेलाने हळुवार मसाज करावा. पित्तप्रकृतीच्या लोकांनी साजूक तूप, गार दुधाची साय, लोणी चोळावे. साजूक तूप हा उष्ण्ता कमी करणारा उत्तम घटक आहे. कैलास जीवन, शतधौत घृत सुद्धा प्रभावी ठरतं. शरीराला एकदम तापमानातील बदलाला सामोरे जाऊ देऊ नका. बाहेरून आल्यावर एकदम जोरात फॅन किंवा एसी लावू नका.
घामोळ्या किंवा पुरळ यावर प्रभावी उपचार कोणते?
घामोळ्या हा उन्हाळ्यात सतावणारा आणखी एक त्रास. घामोळ्या आल्यास अनेक घरगुती आयुर्वेदिक उपायांनी त्वरित आराम पडतो.
- कडुनिंबाची पाने एक ग्लास पाण्यात भिजवून ते पाणी आंघोळीच्या पाण्यात टाकावे.
- पळसाची सात आठ फुले रात्री भिजत घालून,सकाळी कुस्करून गाळून ते पाणी मिसळावे. पळस हे जन्तुनाशक व कृमिनाशक आहे.
- साबणाच्या ऐवजी गुलाबाच्या पाकळ्या, वाळा, ज्येष्ठमध, नागरमोथा यांचे आयुर्वेदिक चूर्ण तुम्ही वापरू शकता. उन्हाळ्यात नेहमी थंड गुणधर्माचे चूर्ण वापरावे.
- पित्तशामक असलेल्या सुंठ पावडरीचा चहा प्यावा.
नाकातून रक्त आल्यास काय करावे?
उन्हाळ्यातील आणखी एक समस्या म्हणजे नाकातून रक्त येणे किंवा घोळणा फुटणे. वाढलेल्या तापमानामुळे नाकातील रक्तवाहिन्या फुटून अचानक नाकातून रक्त आल्यास काय करावे ते आता पाहू या.
- त्या माणसाला आडवे झोपवावे. पाय शरीराच्या वरच्या लेव्हलवर घ्यावेत. त्यामुळे डोक्याकडे रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे येतो.
- मस्तकावर पाण्याचे हबके मारावेत. थंड पाण्याच्य पट्ट्या डोक्यावर किंवा कपाळावर ठेवाव्यात.
- दुर्वांचा रस किंवा पाण्यात खडीसाखर घालून ते पाणी नाकात घातलं तरी रक्त लगेच थांबतं.
- शतावरी कल्प किंवा अनंत कल्प २ चमचे पाण्यात मिसळून घ्यावा. शतावरी हे थंड गुणधर्माचे असल्याने लगेच पित्तशमन करतं व उष्णता कमी होते.
- घोळणा फ़ुटूच नये म्हणून १० ते ४ उन्हात जाणे टाळावे. बाहेर पडावे लागल्यास अर्धा कांदा चिरून डोक्यावर ठेवावा व स्कार्फ गुंडाळावा.
- नाकाला आतून तूप लावावे म्हणजे त्वचा मऊ होते.
- उन्हाळा आला की सर्वप्रथम तोंड येतं. त्यासाठी आहारात बदल करायला हवा. पाणी भरपूर प्यायला हवं.
मूत्रप्रवृत्ती कमी होणे, आग होणे या समस्यांवर काय उपाय आहे?
चमचमीत तिखट तेलकट आहार टाळायला हवा. लघवी आली की लगेच लघवीला जाऊन यायला हवं. लघवी दाबून ठेवू नये. तहान लागली की पाणी प्यावं. उन्हाळ्यात २ ते अडीच लिटर पाणी लागतं. लघवीला जोर लागत असेल तर टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात बसावे. आधी ओटीपोटाला खोबरेल किंवा तिळाचं तेल लावून घ्या. ओटीपोटावर तेल, तूप यांचं अभ्यंग हलक्या हाताने करा. बेंबी किंवा ओटीपोटावर थंड पाणी किंवा तुपाच्या पट्ट्या ठेवाव्यात. गुलकंद, मोरावळा खा. तुळशी किंवा सब्जाचे बी पाण्यातून घ्या. बी पाण्यात घालून फुगले की म्हशीच्या दुधातून घ्या म्हणजे लघवीची तक्रार कमी होते.
उन्हाळ्यातील स्त्रियांच्या इतर समस्या
- उन्हाळ्यात उलट्या होत असतील तर उलटी थांबेपर्यंत जेवू नका. सूतशेखर चाटण, मोरावळा, सुंठ साखर घ्या. साळीच्या लाह्यांचे पाणी प्या. हवेशीर ठिकाणी झोपवून कपडे सैल करा. वारंवार पित्त होत असेल तर मोरावळा खा .
- पायात गोळे येऊन पाय दुखत असतील तर पायांना तीळ तेल, खोबरेल तेल लावा. तळपायाला तूप चोळा, आहारात वातूळ पदार्थ खाऊ नका. पोटातूनही दोन चमचे सकाळी-संध्याकाळी तूप घ्या.
- डोळ्यासमोर अंधारी किंवा भोवळ आल्यास चेहऱ्यावर, टाळूवर गार पाण्याचे हबके मारा. नाकाजवळ कांद्याचा वास द्या. लिंबू सरबत, सूतशेखर चाटण घ्या. डोळ्यावर झोपताना दुधाच्या, गुलाबपाण्याच्या पट्ट्या ठेवा.
उन्हाळ्यात दिनचर्या उत्तम ठेवली,तिखट, खारट कमी खाले, मधुर, हलका, द्रवप्रधान आहार घेतला, झोप घेतली, पित्तशमन केले तर उन्हाळ्याच्या समस्यांवर मात करता येते.
स्त्रियांच्या उन्हाळ्यातील समस्या याबद्दल अधिक माहिती मिळवा
श्री माऊली विश्व आयुर्वेदचे वैद्य आयुर्वेद तज्ञ डॉ. विनेश नगरे यांची ही मुलाखत पहा. सर्व नवीन व्हिडिओजची माहिती मिळविण्यासाठी खालील यूट्यूब बटणवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
Subscribe
Looking for Treatment? Book Your Appointment Here